गणेश मूर्ती व प्रदूषण

गेली काही वर्षे गणपती उत्सव जवळ आला की ज्या विषयांवर वाद-विवाद सुरू होतात त्यात ‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्ती, त्यांच्या विसर्जनामुळे होणारे प्रदूषण, त्या मूर्तींवर बंदी आणण्याची मागणी, ‘पर्यावरणपूरक’ मूर्ती असे बरेच काही हिरीरीने मांडले जाते. या विषयाबद्दल थोडी सविस्तर मांडणी करणे हा या लेखाचा उद्देश. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या कचरा व्यवस्थापनासाठी केलेल्या संशोधनात मी सहभागी होतो. त्यात आलेले अनुभव व माहिती मी येथे मांडत आहे.

पॅरिसच्या उत्तरेला असलेल्या मौंमार्त्र (Montmartre) या टेकडीवरील जिप्समचे दगड भाजून नि दळून केलेली पूड म्हणजे प्लॅस्टर ऑफ पॅरिस (पीओपी). मूर्ती करण्याखेरीज ही पूड अनेकविध कामांसाठी वापरली जाते – भिंतींना गिलावा करण्यासाठी, ‘फॉल्स सीलींग’ साठी, मोडलेल्या हाडाला आधार देण्यासाठी, खडू करण्यासाठी, अग्निरोधक म्हणून आणि रसायनशास्त्राच्या प्रयोगांत चंबू हवाबंद करण्यासाठी. अशा विविध प्रकारे पीओपी गेले एक ते दीड हजार वर्षे उपयोगात आणले जाते आहे. सुमारे शंभर वर्षांपासून पीओपीचाच एक प्रकार दंतवैद्य कृत्रिम दातांसाठी साचा करण्यासाठी वापरतात.

आज या सर्व उपयोगांमध्ये मूर्ती तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पीओपीचे प्रमाण किती आहे याचा खात्रीशीर आकडा उपलब्ध नाही. पण बांधकाम क्षेत्रातल्या तज्ञांशी बोलून अंदाज घेतला तर मूर्तींसाठी वापरले जाणारे पीओपी एकूण पीओपीच्या पाच टक्क्यांहून जास्त नसावे असे तज्ञांचे मत आहे.

त्या अंदाजाला आधार देण्यासाठी एक गणित

पुण्यात विसर्जन होणाऱ्या पीओपीच्या मूर्ती सुमारे पाचशे टन असतात या अंदाजाला मनपा, स्वयंसेवी संस्था आणि वृत्तमाध्यमे दुजोरा देतात. दहा दिवसांत पाचशे टन म्हणजे दिवसाला सुमारे पन्नास टन. एवढे पीओपी बांधकाम क्षेत्रात एका मध्यम-मोठ्या प्रकल्पात एका दिवसात वापरले जाते. वर्षभर. आणि गणपतीच्या मूर्ती महाराष्ट्र आणि जवळपासच्या राज्यांतच केल्या जातात. बांधकाम देशभर चालते. म्हणजे पाच टक्के हा सुद्धा खरे तर अति-अंदाजित आकडा आहे.

इतर क्षेत्रांत वापरल्या जाणाऱ्या पीओपीचे कचरा व्यवस्थापन कसे केले जाते? वापराबाबत आघाडीवर असलेल्या बांधकाम क्षेत्रात राडा रोडा कुठेतरी नेऊन टाकणे यापलिकडे काहीही केले जात नाही. ठिकठिकाणी दिसणारे राडारोड्याचे ढीग मूक साक्षीदार आहेत.

गलबला का ?

मग गणपतीच्या दिवसांत पीओपी कसे पर्यावरणाला घातक आहे असा गलबला का सुरू होतो? आणि त्याचाच एक भाग म्हणून ‘पर्यावरणपूरक’ मूर्तींची भलावण कशी केली जाते याकडे नीट पाहू.

शाडूच्या मूर्ती पर्यावरणपूरक असतात असे एक मिथक जनमानसात अधिष्ठान पावून आहे. शाडू माती म्हणजे मृदा नव्हे. थोडक्यात, शाडू माती निर्जीव असते. विसर्जन केल्यावर तिचा गाळ तयार होऊन तळाला बसतो. आणि नदीव्यवस्थेत गाळ हा पर्यावरण-घातक असतो, पर्यावरणपूरक नव्हे. त्यात अजून काही पदार्थ मिसळून त्याला ‘पर्यावरणपूरक’ अशी चिठ्ठी चिकटवण्याआधी त्यात नक्की ‘पर्यावरणपूरक’ काय आहे या प्रश्नाचे उत्तर शोधणे गरजेचे आहे.

तुरटीच्या मूर्ती कराव्यात म्हणजे त्या विसर्जित केल्यावर पाणी आपोआप शुद्ध होईल अशीही मांडणी कुणी केल्याचे ऐकिवात आहे. तुरटीच्या मूर्ती करण्यासाठी लागणारी कलाकारी कितीजणांकडे आहे, तुरटीच्या मूर्ती सुमारे सुपारी ते सफरचंद या आकाराच्या होऊ शकतील. त्याहून मोठ्या करायच्या झाल्यास एवढी अख्खी तुरटी कुठे मिळेल, मुळात सर्व मूर्ती तुरटीच्या करायच्या झाल्यास तेवढी तुरटी उपलब्ध आहे का आणि त्याची किंमत किती पडेल, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात तुरटी नदीपाण्यात जाणे पर्यावरणाला पूरक आहे की मारक या प्रश्नांबद्द्ल अर्थातच मुग्धता आहे.

पीओपीच्या मूर्ती का केल्या जातात, आणि त्यांच्या विसर्जनामुळे प्रदूषण होते म्हणजे काय होते या प्रश्नांची उत्तरे शोधली तर चित्र स्पष्ट होईल.

या कारणांनी पीओपीच्या मूर्ती केल्या आणि विकल्या जातात.

आता पीओपीच्या मूर्ती विसर्जित केल्याने प्रदूषण होते म्हणजे काय होते ते पाहू.

पीओपी विषारी नसते. विसर्जन केल्यावर पीओपीची मूर्ती फारशी न विरघळता तशीच पडून राहते. मग पाण्याच्या प्रवाहातल्या इतर पदार्थांशी टकरा होऊन ती हळूहळू भंग पावत जाते. मुंबईच्या समुद्रकाठांवर किंवा नद्यांच्या पात्रांत याची उदाहरणे भरपूर दिसतील.

मग पीओपीचे प्रदूषण म्हणजे काय?

याला उपाय काय?

प्रथम वाहत्या पाण्यातच मूर्ती विसर्जन करण्यामागचा हेतू काय ते पाहू. धर्मशास्त्रात तसे सांगितले आहे हे उत्तर शंभर टक्के बरोबर आहे. फक्त त्याच धर्मशास्त्रात मूर्ती कशाची करावी हेही सांगितले आहे हे लक्षात ठेवावे. मूर्ती नदीतील गाळाची करावी असे धर्मशास्त्र म्हणते. म्हणून वाहत्या पाण्यात (म्हणजे नदीत) विसर्जन करावे हे योग्यच. नदीपात्रातला गाळ नदीपात्रात परत जाऊन एक चक्र पूर्ण होते.

मूर्ती करताना पीओपी, शाडू माती, कागदाचा लगदा असे पदार्थ वापरायचे, तेव्हा धर्मशास्त्र रेशमात गुंडाळून ठेवायचे. विसर्जन करताना धर्मशास्त्राला उजेड दाखवायचा. तर्क-बुद्धीला हे मान्य असेल तर प्रश्नच मिटला, नव्हे उद्भवलाच नाही. पण ही विसंगती कळत असेल तर पुढचा भाग – मग या पीओपीच्या कचऱ्याचे करायचे काय ? त्याला दोन उत्तरे आहेत. औष्णिक/सौर आणि यांत्रिक ऊर्जा वापरून पीओपी पुनर्वापरासाठी तयार करता येते. वा रासायनिक प्रक्रिया करून पीओपीचे रूपांतर चुना (बांधकामासाठीचा) आणि खत यांमध्ये करता येते.

पहिला मार्गः औष्णिक/सौर आणि यांत्रिक ऊर्जा वापरून रूपांतर

पीओपीची रासायनिक संज्ञा कॅल्शियम सल्फेट (CaSO4·1/2H2O). मूर्ती केल्यावर ही संज्ञा होते (CaSO4·2H2O). म्हणजे काय, तर प्लॅस्टर ऑफ पॅरिस जेव्हा कोरडा भुगा स्वरूप दिसते तेव्हाही त्यात सुमारे पाच टक्के पाणी रेण्विक पातळीवर बंधित असते. मूर्ती करताना आपण अजून पाणी घालून त्याचा लगदा करतो तेव्हा ते वीस टक्क्यांवर जाते. मूर्ती खडखडीत उन्हात वाळवली तरी हे वीस टक्के पाणी तसेच असते. किंबहुना, त्यामुळेच मूर्ती उभी रहाते.

जर तापमान १४० डिग्री सेल्सिअसपर्यंत नेले तर हे पाणी निघून जाते आणि मूर्ती पूर्ण ठिसूळ होते. हाताने सहज भुगा करता येईल इतकी. हा भुगा बारीक दळून घेतला आणि चाळून घेतला तर जे ‘पीठ’ मिळेल ते म्हणजे शुद्ध पीओपी. परत वापरण्यासाठी तयार. अशा प्रकारे मिळवलेल्या पीओपीचा वापर करून पुनःपुन्हा मूर्ती तयार करता येतात. पाच वेळेस तर नक्की, कारण आम्ही करून पाहिल्या आहेत.

अशा प्रकारे पीओपी परत मिळवायचे असेल तर तापवणे, दळणे आणि चाळणे या क्रिया कराव्या लागतील.

दुसरा मार्ग – रासायनिक प्रक्रिया

अमोनियम कार्बोनेट [रासायनिक संज्ञा (NH4)2 CO3] च्या द्रावणात मूर्ती बुडवली तर ७२ ते ९६ तासांत ती पूर्ण विरघळते. इथे मूर्ती सुमारे एक किलो वजनाची (घरगुती उत्सवात वापरलेली) आहे असे गृहीत धरले आहे. विरघळल्यानंतर त्या द्रावणाचे घटक असतात कॅल्शियम कार्बोनेट (बांधकामासाठीचा चुना) आणि अमोनियम सल्फेट (बागेसाठी खत). एक किलो मूर्तीसाठी सुमारे एक किलो अमोनियम कार्बोनेट लागते. द्रावण करण्यासाठी एक किलो अमोनियम कार्बोनेट नऊ लिटर पाण्यात विरघळवावे लागेल.

अमोनियम कार्बोनेट ऐवजी अमोनियम बायकार्बोनेट (निम्म्याहून स्वस्त पडते) वापरले तर विरघळल्यानंतर त्यात कार्बॉनिक ऍसिडही हे सौम्य आम्लही तयार होते. या द्रावणाला अमोनियाचा मंद वास येतो, पण त्रास होण्याइतका नाही.

याबद्दल अधिक माहिती हवी असल्यास saadhan at disroot dot org या पत्त्यावर संपर्क साधावा.

संपर्क

या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्याशी इ मेलने संपर्क साधाः
vidnyanmail

उदय आठल्ये म्हणतातः

September 30, 2023 at 9:11 am

श्री. उदय ओक यांचा अत्यंत वाचनीय, उद्बोधक लेख नुकताच वाचला. हा लेख, गणपतीसाठी वापरण्यात येणाऱ्या शाडूमाती, पी.ओ.पी. यासंंबंधी होता. सर्वप्रथम अत्यंत अभ्यासपूर्ण, विचारप्रवर्तक लेख लिहिल्याबद्दल श्री. ओक यांचे अभिनंदन व आभार.

हा लेख वाचल्यावर मला एक सुभाषित आठवले. ते येथे लिहिण्याचा मोह आवरत नाही.

सुलभाः पुरुषाः राजन् सततं प्रियवादिनाः ।।
अप्रियस्यच पथ्यस्य वक्ता श्रोताच दुर्लभः ।।

(हे राजा, प्रिय असे बोलणारे पुष्कळ असतात, मात्र अप्रिय आणि पथ्यकर असे सांगणारे दुर्मीळ आणि ऐकणारेही !)

सद्यपरिस्थितीत Refuse, Reduce, Recycle हे गृहीतक किती लोकांना माहीत असेल, याचे खात्रीशीर उत्तर मिळणे असंभव आहे. गणपती उत्सव साजरा करण्यासाठी केवळ Refuse याचाच विचार केला आणि अमलात आणला तर पुढचे बहुतांशी प्रश्न टाळता येतील.

महाराष्ट्रात बहुतेक घरात सत्यनारायणपूजा होते. त्यावेळी सुपारी गणपतीचे प्रतीक म्हणून पुजली जाते. हीच प्रथा गणेश चतुर्थीला पाळली गेली तर कोणाच्या धार्मिक भावना दुखावतील काय ? थोडक्यात, गणेशमूर्ती अवाच्या सवा किमतीला विकत आणून, विसर्जनाच्या दिवशी नदी प्रदूषित करण्यापेक्षा घरातील धातूची मूर्ती, सुपारी यांची पूजा केली, तर गणपतीने बुद्धी दिल्याची पावतीच मिळेल. यालाच मी गणपती बाहेरून आणण्यास Rfuse करावे असे म्हणीन. जर हे पाळले गेले तर Reuse व Recycle यांचा प्रश्नच राहणार नाही.

भारतासारख्या पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या देशात पाण्याचे प्रदूषण करण्याची ही चैन आपल्याला परवडणारी नाही. गणपती विसर्जन नदीमधे करण्यास कायद्याने प्रतिबंध करण्यात यावा या मताचा मी आहे, आणि सदर कायद्याचे काटेकोर पालन व्हावे अशीही आशा मी बाळगतो.

या विषयावर खूप बोलण्यासारखे आहे. पण… असो !

Punamchandra म्हणतात:

September 28, 2023 at 4:32 pm

हा लेख मला खूपच माहितीपूर्ण वाटला नेहमी पाहण्यात येणाऱ्या POP बद्दल कधी असा दुसऱ्या अंगाने विचार केला नव्हता. POP च्या मूर्ती बनविण्याची प्रक्रिया सोपी, किफायतशीर आणि जलद आहे, आणि हिच कदाचित ह्या पर्यायातील अडचण आहे असं मला वाटते. साच्यात बनवता येत असल्याने POP ची मूर्ती कितीही मोठ्या स्वरूपाची बनवता येऊ शकते. बर तर बर ती शाडूसारखी ठिसूळ नसल्याने माल वाहतूककरण्याच्या दृष्टीने सोयीची असते.

हिच प्रक्रिया गेल्या काही वर्षात खूप मोठ्या प्रमाणात गणेशउत्सवाच्या बाजारीकरणाला कारणीभूत झाली आहे. एकदा बाजारीकरण आले कि प्रश्न फक्त मुर्तीपुरता राहत नाही इतरही अनेक गोष्टीचा विचार करणे क्रमप्राप्त असते. गेल्या काही वर्षात ह्या मूर्ती चीन, बांगलादेश सारख्या देशातून आयात केल्या जातात. गणेशउत्सवही अनेक राज्यात पोहोचला आहे असे दिसते. मूर्तीच्या निर्मिती प्रक्रियेची व्याप्ती इतक्या मोठया प्रमाणात वाढली असेल तर त्यांची विसर्जनानंतरची व्यवस्थापन करायलाही नवीन उद्योग लागतील.

POP च्या सुंदर मूर्ती भाविकांच्या पसंतीच्या असणे स्वाभाविक आहे. वास्तविक पाहता अष्टविनायकातील मूर्ती ह्या रेखीव मूर्ती नाहीत. पण उत्सवासाठी घरी अशा मूर्ती लोकांना भावत नाहीत. ह्यालाही मला वाटते बाजारीकरण जबाबदार आहे. अध्यात्मिक बाजू पहिली तर मूर्तिकार शाडूच्या मूर्ती हाताने बनवताना देवासोबत एकरूप होतो. आणि हीच एकरूपता आपल्या पूर्वजांना कदाचित अपेक्षित असावी. भले मूर्ती तितकीशी रेखीव नसेलही. म्हणून कदाचित श्रीगणेशाचे चित्र आणि मूर्ती ह्या मध्ये मी सगळ्यात जास्त विविधता, कल्पकता पहिली आहे, तितकी इतर कुठल्या देव देवतांच्या मूर्तीमध्ये नाही पहिली. असो जरी शाडूमाती इतक्या मोठ्या प्रमाणात वापरात आली तर आपण त्यातही बाजारीकरण आणू शकतोच आणि लेखात नमूद केल्याप्रमाणर त्याचेही पर्यावरणावर दुष्परिणाम आहेतच.

uday oak says:

September 28, 2023 at 3:18 pm
अभिजीत आणि स्वाती,
प्रतिसादांबद्दल धन्यवाद!

ठिकठिकाणच्या नगरपरिषदा, नगरपालिका आणि महानगरपालिका मूर्ती संकलन उपक्रम राबवतात. त्या संकलन केलेल्या मूर्त्यांचे पुढे काय होते हे पाहणे उद्बोधक ठरेल.

या मूर्त्या ठिकठिकाणी वापर थांबलेल्या दगडांच्या खाणींत (वा तत्सम भौगोलिक ठिकाणी) नेऊन टाकल्या जातात (इंग्रजीत, “dump” केल्या जातात). पुण्यात हे करण्यासाठी एका महामार्गाजवळच्या खाणी निवडल्या आहेत. त्या खाणींच्या मालकांना यासाठी मनपा पैसे देते. ती खाण भरल्यावर नवीन ठिकाणचा शोध घेतला जातो. भरलेल्या खाणींवर अजून माती लोटून त्या सुमारे समतल दिसायला लागल्या की त्याचे प्लॉट्स पाडून विक्री होते. सहकारनगरच्या तळजाई टेकडीजवळ अशा एका ‘प्लॉट’वर बांधलेली इमारत अख्खी खचल्याची घटना घडलेली आहे.

Swati says:

September 27, 2023 at 9:41 pm

या लेखामुळे माझे POP विषयीचे गैरसमज दूर झाले. आणि POP चा पुनर्वापर सहज शक्य आहे हे कळले.

मला असे वाटते की POP मूर्तींविषयी च्या वादात प्रदूषणाच्या बरोबरीने POP च्या विघटनासाठी लागणाऱ्या कालावधीमध्ये होणारी मूर्तींची विटंबना हाही मुद्दा महत्त्वाचा आहे. काही वर्षांपूर्वी समाज माध्यमांवर तुंबलेल्या घाण पाण्यात साठलेल्या तुटक्या – फुटक्या मूर्तीचे फोटो प्रसिद्ध झाले होते. तेंव्हापासून या समस्येविषयी चर्चेला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली असे मला वाटते. आणि मग यावर उपाय म्हणून शाडू माती पासुन बनवलेल्या मूर्तीं वापरासाठीचे आवाहन वाढू लागले. शाडू ‘ माती ‘ असल्याने तिचा प्रदूषणाशी संबंध असेल असे अभ्यासाशिवाय लक्षात येत नाही.

प्रदूषणाचा विचार करता जर ते POP आणि शाडू या दोन्ही माध्यमांमुळे होत असेल तर प्रदूषण हे कारण मूर्तींचे माध्यम निवडण्यासाठी योग्य नव्हेच. मग अशावेळी निवड कशाच्या आधारावर करावी? मला यात दोन मुद्दे महत्त्वाचे वाटतात. पहिला म्हणजे पुनर्वापर करण्याच्या दृष्टीने शाडू माती ही POP पेक्षा सहजसुलभ. पाण्यात विरघळवून पुन्हा सुकवली की तयार. मला असे वाटते की ज्यांना शक्य आहे (आवड, सवड आणि नवीन शिकण्याची हौस) त्यांनी शाडू मातीची मूर्ती बनवावी, घरीच विसर्जन करून तीच माती जमा करून पुढच्या वर्षी परत वापरावी. आमच्या घरी मागचे ४ वर्ष मी अशा पद्धतीने मूर्ती बनवली आहे. खूप दिखाऊ नसली तरी अशा स्वहस्ते बनवलेल्या मूर्तीकडे बघण्यातला आनंद काही औरच.

मूर्ती माध्यम निवडीतला दुसरा मुद्दा म्हणजे सोय किंवा प्राधान्य. सगळ्यांना वेळेअभावी, कौशल्या अभावी घरी मूर्ती बनवणे शक्य नसते. काहींसाठी सुबकता ही प्राधान्याची गोष्ट असते. सध्या सगळ्या गोष्टींबरोबरच गणेशोत्सवाचे ही जागतिकीकरण झाले आहे. त्यामुळे अलीकडे घरोघरी गणपती असतो. साहजिकच मूर्तींची मागणी खूपच वाढली आहे. एवढ्या मोठ्या संख्येला शाडू माती कदाचित पुरे पडणारही नाही. अशावेळी POP मूर्तीं मुळे झालेली सोय खूपच फायद्याची आहे किंबहुना त्याला पर्याय नाही.

आपल्या लेखात सुचविलेली POP मूर्ती विरघळवण्याची पद्धत सोपी असली तरी त्यासाठी पुन्हा एकदा काही नवीन करून बघण्याची हौस महत्त्वाची. ज्यांना सोय महत्त्वाची वाटते त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणावर राबवले जाणारे उपक्रमच ( जसे गणपती बनवण्यासाठी कारखाने ) कदाचित उपयोगी ठरतील. मला पुणे महानरपालिकेने सुरू केलेला ‘मूर्ती संकलन’ उपक्रम त्यादृष्टीने उपयोगी वाटला. माझ्या घराजवळच्या संकलन केंद्रात मागच्या वर्षी आणि यावर्षीही खूप मोठ्या प्रमाणावर लोकांनी मूर्ती विसर्जन केले. गटारसदृश वाहत्या पाण्यापेक्षा स्वच्छ पाण्याने भरलेल्या हौदाला लोकांची पसंती वाढते आहे.

ABHIJIT SURYAVANSHI म्हणतातः

September 18, 2023 at 9:29 pm
Respected sir,
I have read the article.
Artical has covered all the aspect religious,recycling of plaster of Paris, environmental effects on aquatic animals & amphibians too.
Article is very informative & eye opener.
Ganapati idols of P.o.p. & pollution many people may have no. of opinions and debates.
I think root cause is Ganapati Utsav where nowadays people are establishing Ganapati idols of p.o.p for short period of time at home,public places & on road without knowing its religious holiness/rituals or SHASTRA.
Ganesh utsav is driven by political ,showing religious dominance & mainly by people who are seeking for enjoyment by any means.Which ruins religious/social purpose of Ganesh utsav .

In positive way a new segment/ business of p.o.p idols manufacturing has established in and helping economy at micro level & few dependents on it in last few years. But recycling p.o.p is big issue I think,throwing p.o.p. in water is like killing ecosystem directly & big sin too. Even if recycling through chemicals as mentioned in artical at individual level it seems to be hectic and may cause health issues if handled unsafely. Even if a solution to establish company to recycle used p.o.p generated by any means not only Ganapati idols. Profitability, recycling from root levels, greed , political, industrial power & competition all this mess finally going harm environment only. I think except medical usage where I think humans/humanity are served by P.o.p. usage must be banned in other field


मुख्यपान-HOMEPAGE
लेखकः उदय ओक, तारीखः September 14, 2023