आपली स्वतःची वेबसाइट बनवा

हा लेख स्वतःची वेबसाइट असावी असे वाटणाऱ्या लोकांसाठी आहेच. पण ज्या लोकांना इंटरनेट म्हणजे केवळ ट्विटर, फेसबुक असं वाटतं त्यांच्यासाठी देखील आहे. स्वतःची वेबसाइट तयार केल्यावर मिळणारे फायदे आणि संभाळण्याची जबाबदारी माहीत व्हावी यासाठी आहे.

का बनवायची वेबसाइट ?

"मला काही सांगायचंय" असं अनेकांना वाटत असतं. त्यासाठी आता इंटरनेटचा मार्ग हा राजमार्ग ठरला आहे. बऱ्याचशा लोकांना फेसबुक, ट्विटर या सारख्या महा-कंपन्यांनी चालवलेल्या साइटवर आपलं म्हणणं मांडणं सोयीचं वाटतं कारण त्यांचं म्हणणं ऐकणारा, वाचणारा वर्ग इथं आयताच मिळतो. इथं मिळणाऱ्या "लाइक्स"ची संख्या वाढली की मग आपलं लेखन भलतंच पसंत पडताय लोकांना, असा भ्रम वाढू शकतो. पण हे सगळं खरं नसतं. कारण ...

 1. मुळात रोज ज्या ठिकाणी हजारो लोकांची मतं, अनुभव मांडली जातात तिथं एकाचं लेखन लगेचच काळाच्या पडद्याआड जात रहातं. तुमचा मागच्या महिन्यात लिहिलेला लेख कितीही महत्वाचा असला तरी तो नंतर लोकांच्या नजरेसमोर राहीलच असं नाही.
 2. त्याखेरीज आणखी एक महत्वाची गोष्ट नजरेआड केली जाते. ती म्हणजे या कंपन्यांना हवं त्याप्रकारचं लेखनच या साइटवर सतत "लोकप्रिय" ठरतं. या कंपन्यांनी तयार केलेली सॉफ्टवेअर नियमावली (algorithm) तुमचं लेखन किती "लोकप्रिय" करायचं हे ठरवत असते.
 3. सर्वात महत्वाची गोष्ट अशी की या महा-कंपन्यांचा या साइट्स चालवण्याचा खरा हेतु तुम्हा-आम्हाला प्रसिद्धी वा प्रसारासाठी इंटरनेटवर जागा देणं हा नाही तर पैसा मिळवणं हा आहे. पैसा मिळवण्यासाठी याच जागेवर जाहीरात दाखवून कंपन्या पैसा मिळवतातच. त्याशिवाय तुम्ही त्यावर केलेले लेखन, टाकलेले फोटो, ऑडिओ, व्हिडिओ या गोष्टी इतर कंपन्यांना, जगातल्या विविध राजकीय पक्षांना, विकल्या जातात. या कंपन्यांचे ग्राहक अशा माहितीसाठी नेहमीच भुकेले असतात. ही भूक भागवायला कोणतीही किंमत देण्याची त्यांची तयारी आणि ताकद असते. तुमची अशी माहिती कंपन्यांच्या मालकीची होते आणि ही गोष्ट तुम्ही-आम्ही या साइट्सचे सदस्य होताना भरलेल्या फॉर्ममधे आपल्याकडून मान्य करून घेतलेली असते.

वर उल्लेख केलेल्या अडचणी जर तुम्हाला महत्वाच्या वाटत असतील तर, यावर काही उपाय नाही का ? असा प्रश्न तुम्हाला पडू शकेल. तुम्हाला जे काय वाटतं ते तुम्हाला जगात सांगायचं तर आहे, पण तुमच्या माहितीवर, लेखनावर वा निर्मितीवर केवळ तुमचंच नियंत्रण (ती माहिती खोडून टाकण्याचं सुद्धा) असायला हवं असं देखील तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही स्वतःची वेबसाइट तयार केली पाहिजे. पण ती करताना महत्वाचे मानसिक अडथळे ओलांडावे लागतात....

 1. महा-कंपन्यांनी बनवलेल्या या संकेतस्थळांचं व्यसन तुम्हाला लागलेलं असतं. तिथे दिसणारे विशिष्ट लोगो, चिन्हं या गोष्टी नसतील तर आपण जगाला काही सांगितलंच नाही असं तुम्हाला वाटू शकतं इतके तुम्ही या संकेतस्थळांच्या आहारी गेलेले असता. तुम्ही या संकेतस्थळांचा वापर बंद केलात तर, मग चक्क काही काळासाठी तुम्हाला withdrawl symptoms सहन करावे लागतात.
 2. ज्या नव्या रूपांत तुम्ही तुमची नवी वेबसाईट बनवता ते रूप तुम्हाला सवयीचं नसतं. मी घरी केलेलं पेय कोक सारख्या चवीचं असलं पाहिजे किंवा घरचा डोसा बाजारपेठेतल्या रेस्टॉरंटमधल्या डोशासारखाच लागला पाहिजे अशा प्रकारच्या अपेक्षा तुम्ही ठेवता.
 3. तुमची वेबसाईट सुरू झाल्यावर ती पहाण्यासाठी तयार (ready made आयता) वाचकवर्ग नसतो. सुरुवातीला काही काळ तरी तो वर्ग जमण्या-जमवण्यात घालवावा लागतो. त्यासाठी तुम्हाला स्वतःला प्रयत्न करावे लागतात.

या नव्या इ-वातावरणाची सवय जर तुम्हाला झाली तर मग मात्र तुम्ही जिंकलात. या नव्या वातावरणाची ओळख करून देण्याचं काम या लेखात पुढे करण्यात येणार आहे.

निओसिटीज् (neocities.org)

स्वतःची वेबसाइट बनवायची तर अनेक पर्याय आज इंटरनेटवर उपलब्ध आहेत. त्यापैकी सर्वात सोपा, विना खर्चाचा पर्याय म्हणजे निओसिटीज् हा आहे.

नाव

तुम्ही ज्या उपक्रमासाठी ही वेबसाइट करणार आहात त्या वेबसाइटला एक नाव हवे. ते नाव आधीच ठरवा. ते ठरवताना पुढील गोष्टींचा विचार करा.

हे नाव आपण ज्या neocities.org या सर्व्हर वर साइट ठेवणार आहोत तेथे आधीच इतर कोणी घेतलेले नसावे. तुम्हाला योग्य वाटणाऱ्या अशा तीन वेगवेगळ्या नावांची एक यादी तयार ठेवा.

neocities.org बद्दल...

विज्ञान केंद्राची मदत

निओसिटीज् ही काही एखादी महाकंपनी नाही. त्यांनी लोकांसाठी उपलब्ध करून दिलेलं सॉफ्टवेअर पूर्णपणे खुलं आहे. त्यामागील तर्क प्रणाली (source code) कोणालाही वाचण्यासाठी उपलब्ध आहे. ही तर्क प्रणाली तुमची कोणतीही माहिती साठवत नाही. त्यामुळे ती माहिती इतरांना विकण्याचा प्रश्नच येत नाही. जगभरात साडेसात लाखापेक्षा जास्त लोकांनी साइट्स निओसिटीज् वापरून तयार केल्या आहेत. विज्ञान केंद्र मुक्त संगणक प्रणालींचा आणि त्या प्रणाली वापरून सेवा देणाऱ्यांचा प्रचार-प्रसार करते. त्यामुळे निओसिटीज् उपक्रमाचा वापर करून लोकांना स्वतःची साइट तयार करण्यासाठी प्रोत्साहन देते.

तुमची स्वतःची वेबसाइट तुम्हाला निओसिटीज् वर चालू करायची असेल तर विज्ञान केंद्रातर्फे तुम्हाला निःशुल्क मार्गदर्शन केले जाते. त्यासाठी कार्यशाळाही घेतल्या जातात. मात्र त्या कार्यशाळेत सहभागी होण्याआधी तुम्ही पुढील गोष्टी करणे अपेक्षित आहे.

 1. निओसिटीज् च्या https://neocities.org या संकेतस्थळावर तुमच्या नावाची नोंदणी करा. त्यावेळी तुमच्या इमेल पत्त्याखेरीज कोणतीही माहिती विचारली जात नाही. हा इमेल पत्ता तुम्ही पासवर्ड़ हरवलात तर तुम्हाला नवा पासवर्ड देण्यासाठीच केवळ वापरला जातो.
 2. नोंदणी करताना तुम्ही खरोखरीचे माणूस आहात (रोबो नाही) हे तपासण्यासाठी कसोट्या (captcha) पार कराव्या लागतात.
 3. तुमची नोंदणी यशस्वी झाली की मग तुम्ही दिलेल्या इमेल पत्त्यावर तुम्हाला नोंदणी यशस्वी झाल्याचे कळवले जाते. व त्या इमेल मधे एक लिंक पाठवली जाते. या लिंकवर तुम्ही गेलात की एक tutorial तुमची वाट पहात असते. सुमारे पंधरा मिनिटांत हे tutorial तुम्ही पार पाडू शकता. तुमची आणि html भाषेची ही पहिली वहिली ओळख.
 4. tutorial संपल्यानंतर तुमच्या साइटवर तुम्ही नवे लेखन करू शकता, किंवा तुमच्या संगणकावर तयार केलेले लेखन निओसिटीज् च्या तुमच्या साइटवर अपलोड करू शकता.
 5. या पुढे लेखन करताना तुम्हाला कोणत्याही शंका असल्यास या शंकाचे निरसन विज्ञान केंद्राच्या कार्यशाळेत केले जाते. त्यासाठी विज्ञान केंद्राकडे नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. कार्यशाळांची तारीख, वेळ इत्यादी माहिती विज्ञान केंद्राच्या संकेतस्थळावर जाहीर होते.
 6. तुमच्या साइटवर टाकण्यासाठी तुम्ही कोणती पूर्वतयारी करून कार्यशाळेत येणे गरजेचे आहे हे तुम्हाला कार्यशाळेसाठी तुम्ही नोंदणी केल्यानंतर तुम्हाला इमेलने कळवले जाते. ती पूर्वतयारी केल्याने तुमचा आणि कार्यशाळेतील इतरांचा वेळ वाचतो.

निओसिटीज् वर विनाशुल्क वेबसाइट बनवता येतेच. पण शुल्क दिल्यास इतर काही सोयी उपलब्ध होतात. विज्ञान केंद्राच्या कार्यशाळेत या बद्दल अधिक माहिती दिली जाते. विज्ञान केंद्राचा आणि निओसिटीज् या उपक्रमाचा कोणताही आर्थिक संबंध नाही.

तुम्हाला तुमची वेबसाइट बनवायची असेल तर पुढे दिलेल्या पत्त्यावर विज्ञान केंद्राशी संपर्क साधा.


मुख्यपान-HOMEPAGE

संपर्क

आमच्याशी संपर्क साधाः
Contact us here:
vidnyanmail

लेखकः विज्ञानदूत, तारीखः Wednesday 10 April 2024 10:56:16 AM IST