विज्ञान - लेखमाला

प्लास्टिकचे रूपांतर


प्लास्टिक हा आपला शत्रू आहे ही गोष्ट पूर्णपणे खरी नाही. योग्य प्रकारे प्लास्टिकचे रूपांतरण केले तर प्रदूषणकारी प्लास्टिकवर खूपच नियंत्रण ठेवता येईल. पुण्यात डॉ. जयंत गाडगीळ व उदय ओक या संशोधकांनी प्लास्टिकचे रूपांतर वंगण, मेण व इतर काही उपयुक्त रसायने यांच्यात करण्यात यश मिळवले आहे. त्यांच्या या उपक्रमाबद्दलची त्यांनी पाठवलेली माहिती पुढे देत आहोत. गाडगीळ व ओक हे विज्ञान केंद्राचे हितचिंतक व संकेतस्थळासाठी लेखन करणारे लेखक आहेत.

कोणते प्लॅस्टिक रूपांतरित होते ?

कचऱ्यात सहा प्रकारचे प्लास्टिक मुख्यतः सापडते, त्याची सरसकट विल्हेवाट लावणे योग्य नाही. मग पॉलिप्रॉपिलिन, हाय डेन्सिटी पॉलिएथिलिन, लो डेन्सिटी पॉलिएथिलिन या तीन प्रकारच्या प्लास्टिकचे एकाच वेळी रासायनिक विघटन करणे योग्य ठरेल. तसेच थर्मोकोल किंवा पॉलिस्टायरीनचे वेगळे विघटन करावे. पॉलिइस्टर आणि पीव्हीसीवर इतर प्रक्रिया होतात.

सध्या इतरत्र काय केले जाते ?

रूढ प्रक्रिया अशीः सगळ्या प्रकारचा प्लास्टिकचा कचरा 650 अंश तापमानापेक्षा जास्त तापमानाला तापवला की तो विघटित होतो. त्यातून पुढील गोष्टी मिळतात.

  • सुमारे 25 टक्के ज्वलनशील वायू. मात्र या वायूचा इंधन म्हणून वापर करणे किफायतशीर नसते. शिवाय वातावरणात सोडला तर तो हरितगृह परिणाम वेगाने करतो.
  • 45 टक्के ज्वलनशील द्रव. मात्र त्यातील काही रसायने जळल्यानंतर घातक ठरतात.
  • उरलेला भाग कार्बन

आमचे वेगळेपण काय आहे ?

आम्ही उत्प्रेरक (कॅटेलिस्ट) तयार केला. ज्याप्रमाणे मांसाहारी पदार्थ हे पपई, दही अशा पदार्थामधे घोळवल्यावर शिजणे सोपे होते, त्याप्रमाणे कॅटेलिस्ट वापरल्यामुळे रासायनिक प्रक्रिया कमी तापमानाला होऊ शकते. त्यामुळे प्रक्रियेला लागणारी ऊर्जा व त्याचा खर्च कमी होतो. कमी तापमानाला विघटन झाल्यामुळे त्यातून कमी प्रमाणात वायू आणि जास्त प्रमाणात ज्वलनशील द्रव तयार होतो. तसेच या द्रवाचे वेगवेगळ्या घनतेचे आणि उत्कलन बिंदूंचे वेगवेगळे भाग मिळतात. याचा

  • रंग (ऑइल पेंट) पातळ करण्यासाठी थिनर म्हणून वापर करता येतो.
  • यंत्रे साफ करण्यासाठी वापर करता येतो.
  • ग्रीज हे यंत्रात वंगण म्हणून वापरता येते.

हे आर्थिकदृष्ट्या अधिक किफायतशीर असते. तसेच राहिलेल्या कोळसा- कार्बनचेही रसायन उद्योगात अनेक उपयोग करता येतात.

लहान लहान यंत्रांची गरज

reactor.jpg
Figure 1: आमचे प्लास्टिक-रूपांतर संयंत्र

कवडीमोलाचा कचरा वाहून नेणे खरे तर किफायतशीर नसते. त्यामुळे आम्ही अशी संयंत्रे (reactor) बनवली, की ती फक्त पाच किलो कचऱ्यावर सुध्दा प्रक्रिया करतील. त्यामुळे अगदी १ हजार लोकवस्तीतूनही अशी यंत्रे बसवता आणि वापरता येतील. मोठ्या आकारमानाची संयंत्रे तर बनवता येतातच.

आतापर्यंत हे संयंत्र विजेवर चालवत आहोत. पण तयार झालेल्या द्रवाचाच इंधन म्हणून वापर करून ही रासायनिक क्रिया करणे अधिक किफायतशीर होते. असे संयंत्र सहजसोप्या पध्दतीने कसे तयार करता येईल, व वापरता येईल, याचे मार्गदर्शनही आम्ही करू इच्छितो. थर्मोकोल आणि रबराचेही इंधनाव्यतिरिक्त उपयोग आहेत. त्यावरही संशोधन चालू आहे.

तुम्हाला अशा प्रकल्पात रस वाटत असेल तर आमच्याशी संपर्क साधाः

  • jayant.m.gadgil at disroot.org
  • udayoak at disroot.org

तुमची प्रतिक्रिया तुम्ही इमेल ने पुढील पत्त्यावर पाठवू शकता.
editormail.png


मुख्यपान

Author: विज्ञानदूत

Created: 2022-01-18 Tue 11:30