विज्ञान सर्वांसाठी -२


"विज्ञान सर्वांसाठी" या विषयावर मी काही काळापूर्वी रेडिओ इन्फिनिटी या कम्युनिटी रेडिओवर जी आठ व्याख्याने दिली ती क्रमाने येथे देत आहे. हे माझं दुसरं व्याख्यान.

ऐका...मात्र तुम्हाला हे व्याख्यान वाचायचं असेल तर तुम्ही ते इथेच वाचू शकता. ते भाषण लिखित रूपात पुढे दिलं आहे.

मुक्त संगणक प्रणाली

एक सद्गृहस्थ आमच्या गल्लीत रहातात त्यांचं नाव छबूराव. काटेकोर व्यवहारी म्हणून छबूराव प्रसिद्ध आहेत. तर.. छबूराव वाण्याच्या दुकानात गेले. तेलाची पिशवी घेऊन घरी आले. पिशवी कापून आतलं तेल ओतण्याआधी त्यांनी पिशवीवरचा मजकूर पाहिला आणि ते चिडून दुकानात परत गेले.
वाण्याला म्हणाले, "शेटजी हे काय, तुम्ही फसवलंत.”
"ते कसं काय ?” शेटजी म्हणाले.
"इथे पिशवीवर काय लिहिलय पाहिलंत ? कोलेस्टेरॉल फ्री! चला देऊन टाका फ्रीमधे कोलेस्टेरॉल !” छबूराव म्हणाले.

फ्री सॉफ्टवेअर म्हणजे काय ?

संगणक वापरणाऱ्यांत अशा छबूरावांची संख्या फार मोठी आहे. त्यामुळे फ्री सॉफ्टवेअर म्हणजे मोफत मिळणारं संगणकाचे सॉफ्टवेअर असा गैरसमज आहे. हा गैरसमज इंग्रजी भाषेतील "फ्री" या शब्दामुळे निर्माण होतो. इंग्रजी भाषेत फ्री या शब्दाचे दोन अर्थ होतात. एक म्हणजे मोफत आणि दुसरा म्हणजे स्वतंत्र-मुक्त. यातला दुसरा, मुक्त हा अर्थ संगणकीय प्रणालीसाठी लागू पडतो.

  1. अशी प्रणाली कोणत्याही उद्दिष्टासाठी वापरण्याचं स्वातंत्र्य वापर करणाऱ्याला देते.
  2. अशा प्रणालीच्या अंतर्गत रचनेचा अभ्यास करण्याची मुभा सर्वांना असते. कारण या प्रणालीचा उगम कार्यक्रम (सोर्स कोड) अभ्यासासाठी नेहमीच उपलब्ध असतो.
  3. ही प्रणाली इतरांना (मोफत किंवा सशुल्क) वाटण्याचं स्वातंत्र्य वापर करणाऱ्यांना असतं.
  4. या प्रणालीचा उगम कार्यक्रम उपलब्ध असल्यामुळे, ज्यांना शक्य असेल ते या प्रणालीत सुधारणा करू शकतात, आणि सुधारित आवृत्तीचं पुन्हा वाटपही करू शकतात.
आपण अनेकदा जगात प्रसिद्ध असलेली प्रणाली विना परवाना वापरतो. ही प्रणाली वर उल्लेख केलेल्या एकाही गोष्टीचे स्वातंत्र्य वापर करणाऱ्याला देत नाही.

कार्यकारी प्रणाली म्हणजे काय ?

संगणक म्हणजे मेंदू (CPU), स्मृतिकोष (memory) आणि आजूबाजूला जोडलेल्या इलेक्ट्रॉनिक यंत्रणा (peripherals) (माऊस, की-बोर्ड, संगणकाचा पडदा इ.) यांची सुव्यवस्थित जोडणी. मूल लहान असताना हात पाय हलवणं, रडणं, शी-शू करणं अशा क्रिया करू शकतं. त्या त्याला आपोआपच येत असतात. त्या जमण्यासाठीची प्रणाली बाळाला जन्मजातच उपलब्ध असते. संगणकाला त्याचे "अवयव" समजावेत म्हणून BIOS (म्हणजे बेसिक इनपुट आउटपुट डिव्हायसेस) अशी व्यवस्था जन्मजातच मिळते. त्या शिवाय जादा क्रिया करण्यासाठी त्याला एका कार्यकारी प्रणालीची गरज भासते. ही प्रणाली संगणकाच्या विविध अवयवांवर नियंत्रण ठेवते.

जी एन् यू लिनक्स ही एक कार्यकारी प्रणाली आहे. ती मुक्त संगणक प्रणाली आहे. कार्यकारी प्रणाली ही विविध उपयोजित प्रणालींना आधार देते. कार्यकारी प्रणाली प्रभावी व शक्तिमान असेल तर काम सोपं होतं. जी. एन्. यू. लिनक्स वापरून नेहमीची संगणकीय कामे करता येतातच शिवाय ढोबळ मानाने पहाता जी. एन्. यू. लिनक्सला व्हायरसचा त्रास होत नाही.

शिक्षण क्षेत्रात मुक्त प्रणाली

शिक्षण देताना हल्ली संगणक मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. त्यात मुक्त प्रणाली वापरली गेली पाहिजे. कारण,

काही व्यावहारिक शंका

आमचे मित्र बंडूनाना आणि पांडूतात्या यांना जगात घडणाऱ्या अनेक टेक्निकल घटनांबद्दल उत्सुकता असते. मी जेव्हा मुक्त प्रणाली बद्दल सांगितलं, तेव्हा आमच्यात असं बोलणं झालं....
बंडूनानानांनी विचारलं: कॉंप्यूटर शिकून खूप पैसा मिळतो म्हणे. म्हणून तर आम्ही आमच्या बाळ्याला कॉंप्यूटरच्या क्लासात घातलं. आणि तुम्ही तर आता मुक्त का काय ती संगणक प्रणाली वापरायला सांगता. मग त्याला पैसे कसे मिळणार ?
मी म्हणालो: बाळ्या मुक्त प्रणाली वापरून पैसे मिळवू शकतोच. जगात मोठ्या प्रमाणात मुक्त प्रणाली वापरल्या जातात. त्याला या प्रणाली नीट वापरता येत असतील, तर अनेक उत्तम दर्जाची कामं करता येतील. शिवाय काही कंपन्यांना मुक्त प्रणाली वापरण्यात येणाऱ्या अडचणी सोडवूनही तो अगदी भरपूर पैसे मिळवू शकेल.
तितक्यात पांडूतात्यांनी विचारलं: अहो, पण ही तुमची मुक्त प्रणाली मोफत ठेवणं आणि देणं कोणाला आणि कसं परवडतं ? यात काही फसवा फसवी तर नाही ना ?
मी म्हटलं: फसवाफसवी तर तुम्ही वापरता त्या जागतिक दर्जाच्या जगप्रसिद्ध प्रणालीत आहे. त्यांचा इंटरनेट ब्राउजर तुमच्या संगणकावरची माहिती पळवून अज्ञात ठिकाणी साठवून ठेवतो हे आता सिद्ध झालं आहे. त्याला spyware म्हणजे हेरगिरी करणारं सॉफ्टवेअरच म्हटलं जातं. अहो पांडूतात्या, मुक्त प्रणाली ही एखाद्या कंपनीची नसते तर सगळ्या समुदायाची असते.

ही प्रणाली केवळ आमची नाही तर तुमची-आमची आहे बरंका पांडूतात्या ! बंडूनानांचा बाळ्या उद्या कदाचित या प्रणालीत बदल करून नवी प्रणाली तयार करेल. पण तुमच्या सवयीची प्रणाली, हा बदल करण्याची आगळी संधी त्याला कधीच देणार नाही बरं……..
आता तुम्ही विचारलेल्या, परवडण्याच्या प्रश्नाचं उत्तर देतो….या प्रणालीचं काम करणारे अनेक लोक, फावल्या वेळेत हे काम करत असतात. त्यांच्या नोकरी व्यवसायात त्यांच्या पोटाचा प्रश्न सुटलेला असतो. त्यांनी लिहिलेली उपयुक्त प्रणाली बाजारात आणून विकत बसण्याइतका वेळ आणि इच्छा त्यांना नसते. शिवाय त्यांची ही प्रणाली इतरांनी वापरण्यात त्यांना अधिक आनंद मिळतो.

नवनिर्मिती आणि इतरांना मदत करण्याच्या ईर्षेने झपाटलेले लोक फसवाफसवी करतील असं तुम्हाला वाटतं का ?
...लौकरच बंडूनाना आणि पांडूतात्या दोघंही gnu linux ही मुक्त प्रणाली वापरायला लागले.

मुक्त प्रणालीची अधिक माहिती

मित्रहो, मुक्त प्रणालीची थोडी आणखी माहिती ऐका.

समारोप

मित्रहो,

सॉफ्टवेअर म्हणजे संगणक प्रणाली. आपल्या आयुष्यात सॉफ्टवेअरला आता असामान्य महत्व आलं आहे. तुम्ही वापरता त्या मोबाइल पासून ते गाडीतल्या यंत्रणा चालवणाऱ्या संगणकापर्यंत, हिशेब ठेवताना, मतदान करताना सर्व ठिकाणी लहान मोठे संगणकच असतात. या संगणकात वापरलं जाणारं सॉफ्टवेअर जर मुक्त, म्हणजे कोणीही अभ्यासावं यासाठी खुलं असेल तरच या यंत्रणा कोणावरही अन्याय न करता चालतील.

शिकण्यासाठी, शिकवण्यासाठी, मुक्त प्रणाली म्हणजे फ्री सॉफ्टवेअर असेल तर विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतील.

उद्याच्या जगात स्वातंत्र्याचा संकोच न होता जर आपल्याला प्रवेश करायचा असेल तर मुक्त संगणकीय प्रणालीला म्हणजे फ्री सॉफ्टवेअरला पर्याय नाही.

नाही तर...? "या टोपीखाली दडलंय काय" असा संशय आपल्या मनात कायम राहील. पण काहीही करता येणार नाही....


मुख्यपान-HOMEPAGE. तुमचं मत मांडण्यासाठी हे चर्चागृह

संपर्क

आमच्याशी संपर्क साधाः
Contact us here:
editormail

लेखकः विज्ञानदूत, तारीखः २३ नोव्हेंबर २०२२