विज्ञान सर्वांसाठी -७


"विज्ञान सर्वांसाठी" या विषयावर मी काही काळापूर्वी रेडिओ इन्फिनिटी या कम्युनिटी रेडिओवर जी आठ व्याख्याने दिली ती क्रमाने येथे देत आहे. हे माझं सातवं व्याख्यान.

ऐका...मात्र तुम्हाला हे व्याख्यान वाचायचं असेल तर तुम्ही ते इथेच वाचू शकता. ते भाषण लिखित रूपात पुढे दिलं आहे.

विज्ञानाच्या मर्यादा आणि दोष

माणसाला आजूबाजूचं जग समजून घेता येतं ते त्याच्या ज्ञानेंद्रियांच्या बळावर. त्यापैकी डोळा सर्वात महत्वाचा कारण लक्षावधी अंतरावरचे ग्रहतारे तो पाहू शकतो. प्रकाशाची संवेदना माणसाला डोळ्यांमुळे होते. प्रकाश ही माणसानं मिळवण्याच्या ज्ञानाची मर्यादा आहे असं म्हणता येतं. कोणी म्हणेल की जिथे ही ज्ञानेंद्रिय थकतात, तिथे माणसानं यंत्रं निर्माण केली. उदा. विजेचा दाब मोजण्यासाठी स्पर्शाचा वापर घातक आहे हे लक्षात येऊन त्यानं वेगळ्या प्रकारचे मीटर्स निर्माण केले. हे खरं आहे. पण या मीटर्सनी दाखवलेला विद्युतदाबाचा आकडा डोळ्यांनीच पहावा लागतो ना !

विश्वात अशा प्रकारची ऊर्जा असेल की जिचं रूपांतर, माणसाला जाणवेल अशा ऊर्जेत करता येत नाही, तर ती ऊर्जा माणसाला समजणार नाही. विश्वाच्या त्या क्षेत्राचं ज्ञान माणसाला होणार नाही.

त्रिमित जगापलीकडे समज नाही

विज्ञानाला आणखी एक मर्यादा आहे ती त्रिमित जगाची. गणित असं सांगतं की अशा अनंत मिती असू शकतात. पण आपण आजवर तरी अशा इतर मितींचा अनुभव घेतलेला नाही. काळ ही संकल्पना चौथ्या मितीसारखी वापरली जाते. पण त्यापलीकडे माणूस अजून गेलेला नाही. इतकंच नव्हे तर या मितीमधे आपण एकाच दिशेनं म्हणजे फक्त भविष्यकाळात जाऊ शकतो. ही देखील एक मर्यादाच.

विज्ञान म्हणजे माणसानं समजून घेतलेलं विश्व

आजचं विज्ञान हे मानव केंद्रित आहे. माणसाला होणारं विश्वरूपदर्शन आहे.

माणसानं निर्माण केलेलं विज्ञान-तंत्रज्ञान या अर्थानं एकांगी आहे.

विज्ञान तंत्रज्ञान मानवी-किंवा इतरांच्याही भावनांचा विचार करू शकत नाही.

माणसाच्या मनाचं गणिती प्रतिमान करणं अतिशय किचकट आहे. आज तरी ते शक्य वाटत नाही. आणि ते शक्य होऊ सुद्धा नये. तसं झालं तर इतरांच्या मनावर नियंत्रण गाजवण्याची इच्छा त्याला होईल. ही हाव सर्वंकष सत्तेची असेल. Foundation Triology या कादंबरी मालेत आयझॅक एसिमॉव्ह यांनी हा विचार मांडला आहे. एक प्रकारे त्यांनी आपल्याला दिलेला हा इशाराच म्हणावा लागेल.

माणसानं विज्ञानाचा वापर स्वजातीसाठी म्हणजे माणसांसाठी केला. निसर्गातल्या इतर प्राणी वनस्पतींना त्यानं तुच्छ लेखून नियंत्रित केलं. स्वतःचा उद्धार करायचा म्हणजे इतर प्रजातींवर अन्याय करणं आलंच. वृक्षतोड, कीटकनाश, शिकारी, यांमुळे निसर्गातील इतर प्रजातींवर अन्याय माणसानं केला.

आता हाच नियम थोडा पुढे वाढवा. विज्ञान-तंत्रज्ञान वश करणारा एक मानवी वंश दुसऱ्या मानवी वंशाचा विनाश करू इच्छितो. अगदी कीटक, झाडं यांचा केला तसाच. माणसातलीच एक उपजात दुसऱ्या उपजातीला तंत्रज्ञान वापरून नेस्तनाबूत करू इच्छिते. युद्धात उच्च तंत्रज्ञान वापरून दुसऱ्या वंशांना नष्ट करण्यासाठी केलं गेलेलं क्रौर्य आठवा.

अगदी व्यक्तिगत पातळीवरही माणूस जितकं उच्च तंत्रज्ञान वापरत गेला तितका तो इतरांपासून दूर गेला हे लक्षात येतं. हे समजून घ्यायसाठीचं उदाहरण अगदी साधं आहे. व्यक्तिगत मोबाइल आल्यापासून लोकांनी समोरासमोर बसून गप्पा मारण्याचं सोडून दिलं आहे. माणसं एकलकोंडी होत चालली आहेत. संगणक विश्वातले खेळ खेळताना वास्तव काय आहे याचं भान न राहिल्यामुळे २४ तास फक्त संगणकावर आयुष्य घालवणारे आज निर्माण झाले आहेत.

सर्वात मोठा दोष

विज्ञान तंत्रज्ञानाचा सर्वात मोठा दोष आहे नीतिमत्तेकडे डोळेझाक.

आजच्या विज्ञानाबद्दल

सत्ता आणि धन यांच्याच घरी विज्ञान-तंत्रज्ञान आज पाणी भरतं आहे.

मूलगामी संशोधनासाठी पैसा खूप लागतो आहे. एकट्या व्यक्ती किंवा छोटे समूह मूलगामी संशोधन करूच शकत नाहीत. जर असं संशोधन केलं गेलं तर ते परिणामकारक नाही, उलट घातकच आहे अशी आवई उठवली जाते. एखादं संशोधन खऱ्या अर्थानं चांगलं, genuine आहे का हे सामान्य माणसाला आज समजूच शकत नाही.

राजकीय आणि आर्थिक सत्ताधीशांना गैरसोयीचं संशोधन मारलं जाऊ शकतं. त्यांना हवं असलेलं खोटं संशोधन लोकांच्या माथी मारता येतं, मारलं जातं.

समारोप

या भाषणात विज्ञान तंत्रज्ञानाच्या मर्यादा, दोष दाखवताना मी एक निगेटिव्ह, भीषण चित्र रंगवलं आहे असं वाटेल. पण मी फक्त सत्य सांगितलं आहे. इतकंच नव्हे तर या साऱ्यावरचा उपायही मी सुचवणार आहे. तो आहे सम्यक तंत्रज्ञान. त्याबद्दल ऐका पुढच्या व्याख्यानात.


मुख्यपान-HOMEPAGE. तुमचं मत मांडण्यासाठी हे चर्चागृह

संपर्क

आमच्याशी संपर्क साधाः
Contact us here:
editormail

लेखकः विज्ञानदूत, तारीखः २३ नोव्हेंबर २०२२