दोन मुक्त प्रकल्प


ताजे यशस्वी प्रकल्प

विज्ञान केंद्र सदस्य विविध प्रयोग करत असतात. त्यापैकी यशस्वी झालेल्या प्रयोगांचे रूपांतर सर्वांना उपयोगी पडतील अशा उत्पादनांत केले जाते. हे रूपांतर करण्याचे प्रकल्प मुक्त असतात. असे दोन प्रकल्प नव्याने मुक्त करण्यात आम्हाला सानंद अभिमान वाटत आहे. हे दोन प्रकल्प आहेतः

सनटाइम प्रकल्प

सनटाइम प्रकल्प खरे तर जुनाच आहे. पण या प्रकल्पात नव्या अनेक सुधारणा करून तो नव्या रूपात पुन्हा लोकांसमोर मांडत आहोत. यातील मुख्य सुधारणा पुढील प्रमाणेः

 • पूर्वी दर आठवड्याला सूर्योदय सूर्यास्ताच्या वेळा पाहिल्या जात होत्या व पूर्ण आठवड्यासाठी त्या वापरल्या जात होत्या. आता रोज वेगळ्या वेळा वापरून दिवे लावणे व बंद करणे या गोष्टी केल्या जातात.
 • DS1307 या Real Time Calendar chip वर अधिक नियंत्रण करणारी नवी लायब्ररी सॉफ्टवेअर मधे वापरण्यात आली आहे.

सनटाइम प्रकल्पाचा स्वतक संच (स्वतःच तयार करण्याचा संच- DIY kit)

 • या संचाची किंमत सुमारे ६५० रु.
 • ज्या व्यक्तींना इलेक्ट्रॉनिक पी.सी.बी. वर सोल्डरिंग करून घटक जोडता येतात अशांना ही वस्तू नक्कीच बनवता येईल.
 • हा संच बनवायचा असेल तर तुमची मागणी या ठिकाणी नोंदवा. ही कंपनी सनटाइमचे व्यापारी पातळीवर उत्पादनही करते.
 • स्वतक संच वापरून सनटाइम बनवताना अडचणी आल्यास विज्ञान केंद्राच्या चर्चागटात निःशुल्क मदत-मार्गदर्शन मिळते.
 • या प्रकल्पाचा पूर्ण तपशील तुम्हाला येथे अवकरित (download) करता येईल. अभियंते किंवा अभियांत्रिकीचे प्रकल्प करणारे विद्यार्थी यांच्या साठी हा संच व हा तपशील आदर्श ठरेल.

ठिबक प्रकल्प

ठिबक सिंचन करून पाणी, वेळ, ऊर्जा आणि मानवी श्रम यांची बचत करता येते हे सिद्ध झाले आहे. घर तेथे भाजीबाग या उपक्रमात विज्ञान केंद्र भाजी लावायला प्रोत्साहन देत असते.

ज्यांची भाजीबाग थोडी मोठी असेल ते आपल्या रोपांना ठिबक पद्धतीने पाणी देणे पसंत करतील. शिवाय रोज सायंकाळी ठराविक वेळी ठराविक वेळ पाणी देण्याचे काम आपोआप होत असेल तर ते चांगलेच ! त्यामुळे भाजी व रोपांकडे आपल्या सवडीने पण अधिक लक्ष देता येईल. अशा सर्व उत्साही लोकांसाठी ठिबक प्रकल्प आहे.

बाजारात मिळणाऱ्या ठिबक नळ्यांच्या प्रत्येक छिद्रातून दर पाच मिनिटांना सुमारे ७५ मि.लि. पाणी ठिबकते असे आम्हाला एका प्रयोगात आढळले आहे. या हिशेबानुसार हा प्रकल्प वापरून तुम्ही पुढील गोष्टी करू शकताः

 • दिवसा झाडांच्या मुळाशी घातलेल्या पाण्याची उन्हाने वाफ होते. पाण्याचे हे नुकसान कमी करण्यासाठी संध्याकाळी ६ ते ९ या वेळात तुम्ही ठिबक पद्धतीने पाणी देऊ शकता.
 • ६ ते ९ या वेळात कोणत्या वेळी ठिबक सिंचन चालू करायचे त्याची वेळ, गोल फिरणारे बटण वापरून निवडता येते.
 • या ठरलेल्या वेळेनंतर किती मिनिटे (१ ते १२० मिनिटे या मध्यंतरातून) ठिबक सिंचन चालू ठेवायचे ते दुसरे गोल बटण वापरून निवडता येते.
 • ठरलेल्या वेळी, ठरलेल्या वेळेइतके ठिबक सिंचन करून झाले की आपोआप ही यंत्रणा पाणी देणे बंद करते, ती दुसऱ्या दिवशी त्या वेळेपर्यंत.
 • एकदा ठरवलेल्या या वेळा तुम्ही दिवसेंदिवस (वर्षानुवर्षे) वापरू शकता. अर्थात तुम्हाला वाटले तर या वेळांमधे तुम्हाला बदल करता येतोच.

स्वतक संच उपलब्ध

या प्रकल्पाचा स्वतक संच (DIY kit) उपलब्ध आहे. या संचाची मागणी नोंदवण्यासाठी तुम्ही येथे संपर्क साधा.

 • या संचाची किंमत सुमारे ६५० रु. आहे. या संचात केवळ इलेक्ट्रॉनिक यंत्रणा अंतर्भूत आहे, पाण्याच्या नळ्या इत्यादी नाही.
 • ज्या व्यक्तींना इलेक्ट्रॉनिक पी.सी.बी. वर सोल्डरिंग करून घटक जोडता येतात अशांना ही वस्तू नक्कीच बनवता येईल.
 • स्वतक संच वापरून ठिबक यंत्रणा बनवताना अडचणी आल्यास विज्ञान केंद्राच्या चर्चागटात निःशुल्क मदत-मार्गदर्शन मिळते.
 • ज्या व्यक्ती (अभियंते वा अभियांत्रिकीचे प्रकल्प करणारे विद्यार्थी) स्वतंत्रपणे ही यंत्रणा तयार करू इच्छितात त्यांच्यासाठी या यंत्रणेचा पूर्ण तांत्रिक तपशील येथे अवकरित (download) करता येईल.

तुमची प्रतिक्रिया तुम्ही इमेल ने पुढील पत्त्यावर पाठवू शकता. editor at vidnyanlekhan dot in


मुख्यपान

Author: विज्ञानदूत

Created: 2022-01-04 Tue 17:04